न्यूयॉर्क : जगातील नंबर १ टेनिसपटू नोवाक जोकोनिचचं कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं. रविवारी रात्री झालेल्या अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये जोकोविच पराभूत झाला. ५२ वर्षांनी पुरुषांच्या टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास घडवण्याच्या उद्देशानं जोकोविच मैदानात उतरला होता. मात्र रशियाचा डेनियल मेदवेदेवनं त्याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचचा या मॅचमध्ये ४-६, ४-६, ४-६ असा पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेवरनं १९६९ साली एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. जोकोविचननं यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकत अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे ५२ वर्षांनी नवा इतिहास घडेल अशी आशा जोकोविचच्या चाहत्यांना होती. मात्र त्यांची निराशा झाली.
जोकोविचकडं सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड करण्याचीही संधी होती. सध्या तो रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या बरोबरीनं पहिल्या क्रमांकावर आहे. या तिघांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविचला अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकत फेडरर आणि नदालला मागं टाकण्याची संधी होती, पण तसं झालं नाही. मेदवेदेवकडून पराभूत झाल्यानं चौथ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याची जोकोविचची संधी हुकली. त्यानं आजवर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ९ वेळा, फ्रेंच ओपन २ वेळा तर विम्बलडन स्पर्धा ६ वेळा जिंकली आहे.