दिल्लीत हायकमांडसोबत संघटनात्मक बाबींवर चर्चा : नाना पटोले
नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेसने याबद्दल मागणी लावून धरली होती. पण, अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील एका मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यावर हायकमांड यावर निर्णय घेईल, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार यांना समन्स बजावले होते. दिल्लीत तिन्ही नेत्यांनी हायकमांडसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. नितीन राऊत आणि सुनील केदार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले होते. याबद्दल विचारले असता पटोले म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी हजर होतो. पक्ष संघटनात्मक बैठक असल्यामुळे मी बोलणार होतो, त्यामुळे ते निघून गेले असावेत, असं पटोले म्हणाले.
नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभवाबाबत चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातील पक्षबांधणी आणि संघटनात्मकाबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड केली जाईल. काँग्रेसची आधीपासून आग्रहाची मागणी राहणार आहे. २६ ते २७ पर्यंत अध्यक्षपदाची निवड केली जावी, अशी आमची भूमिका आहे. याबद्दल हायकमांडसोबत चर्चा झाली. मला वाटत अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड होईल, नाना पटोले म्हणाले.
अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी काँग्रेसमधून कोणत्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पटोले म्हणाले की, ‘हा निर्णय हायकमांडचा आहे. कुणाची निवड करायची आहे, त्याबद्दलचा निर्णय हायकमांड घेत असते. अध्यक्षापदाबद्दल अद्याप कोणत्याही नावाची चर्चा झाली नाही. ज्या दिवशी निवडणुकीचे माहिती समोर येईल, तेव्हा हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल.
फडणवीस हे कधी मोदींवर टीका करत नाही. लोकसभेत उपाध्यक्ष पद हे दोन वर्षांपासून खाली आहे. उपाध्यक्षपदाची निवड सुद्धा आवाजी मतदानाने होते. त्यामुळे तिथे काही गुप्त मतदान नसते, त्यामुळे कायद्यात सुधारणा झाल्यामुळे देशभरातील इतर राज्यातील विधान परिषदेत आवाजी पद्धतीने मतदान करून निर्णय घेतला जातो. राज्यात हा निर्णय अद्याप घेतला नव्हता. त्यात सुधारणा करून निर्णय घेतला, त्यात आता काही गैर केलं नाही. पण दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा लोकसभेत दोन वर्षांपासून उपाध्यक्षपद रिकामे आहे, त्यावर सुद्धा दोन शब्द फडणवीसांनी बोलायला पाहिजे, असा टोलाही पटोलेंनी लगावला.