राजकारण

दिलीप वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. खुद्द दिलीप वळसे-पाटील यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे अशी राष्ट्रवादीच्या गोटात रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना दिलीप वळसे-पाटील यांनी अखेर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button