राजकारण

फडणवीस सरकारच्या काळातील डिजिटल दलालीचा लवकरच पर्दाफाश : मलिक

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर तयार केल्याच्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात डिजिटल दलाल होता. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले, याचा पर्दाफाश लवकरच करू, असा इशारा मलिक यांनी दिला.

नवाब मलिक यांनी केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत विविध प्रश्नांची सरबत्ती केली. इंधन दरवाढ, महागाई, शेतकरी आंदोलन, जम्मू-काश्मिरातील वाढते दहशतवादी हल्ले आदी मुद्द्यांवर मलिक यांनी भाजपवर टीका केली. केंद्र सरकारने यंत्रणांचा गैरवापर केला असता, तर महाविकास आघाडी सरकारचे निम्मे मंत्रिमंडळ तुरुंगात गेले असते, या फडणवीस यांच्या विधानावर मलिक म्हणाले की, अर्धेच काय, संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात जायला तयार आहे. हिंमत असेल तर टाकून दाखवा. दिल्लीसमोर आम्ही झुकणार नाही, असे मलिक म्हणाले.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली. युपीए सरकारच्या ६० रुपयांवर दर गेल्यावर भाजपने संसद चालू न देण्याची भूमिका घेतली. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांनी, माझ्या नशिबाने कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचे विधान केले होते. आता, कुणाच्या नशिबाने दर वाढत आहेत, कोण कमनशिबी आहे, याचे उत्तर मोदी यांनी द्यावे, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात मलिक म्हणाले की, सात वर्षांपासून भाजपकडे केंद्राचे सरकार आहे. तर दोन वर्षांपासून काश्मीरमध्ये सरकार चालवत आहेत. त्यापूर्वी काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपचीच सत्ता होती. मग तरीही परिस्थिती का सुधारत नाही, याचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे. लोकांची हत्या होत आहेच, लोक जम्मू-काश्मीर सोडून पलायन करत आहेत. आतंकवादी हल्ले थांबत नाहीत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपवूनही दहशतवादी कारवाया का थांबत नाहीत, असा सवाल करतानाच, केवळ प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार संघाला नाही, असेही मलिक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button