मुंबई : काही वेळापूर्वीच अजित पवारांना राज्याचा चार्ज दिला तर अधिवेशन संपायच्या आधी ४ दिवसात अजित पवार राज्य विकून टाकतील, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कोणती टीका कोण का करतो? हे सर्वांनाच माहीत आहे. राज्य विकणे म्हणजे यांना चहा विकण्यासारखे वाटेल का? भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत, यांनी सगळेच विकले आहे, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.
कृषी कायद्यांचे काय झाले? सगळ्या जनतेला माहिती आहे. गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोलावे तेवढी त्यांची पातळी नाही, अजित पवार उत्तम प्रशासक आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुशल नेतृत्व महाराष्ट्रचे आहे. त्यामुळे सगळ्यांचं योग्य प्रकारे सहकार्य महाराष्ट्राला लाभलेआहे, अशी टीकाही मिटकरी यांनी केली आहे. परीक्षा घोटाळा रॅकेटमध्ये नागपूर कनेक्शन देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचेल अशी मला शंका आहे, असेही ते म्हणाले आहेत.
भाजपवर टीका करताना, मोदींवर देशाचा विश्वास नाही, भाजपचे लोक हे विकृत आहेत, अशी खरमरीत टीका मिटकरींनी केली आहे. चंद्राकांत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहे त्यामुळेच सुरक्षित मतदार शोधून आपल्याच पक्षाच्या नेत्याचा राजकीय बळी घेतला, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच परीक्षा घोटाळात समावेश असणाऱ्यांना शिक्षा होईल त्याचे धागेदोरे हे मागच्या सरकारपर्यंत पोहचणार, महाराष्ट्राच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही, असेही मिटकरी म्हणाले आहेत. आधी पडळकरांचे वक्तव्य आणि आता त्याला आलेले राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर त्यामुळे या वादात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधव यांच्याही वक्तव्याने मोठा गदारोळ झाला आहे, त्याला काही तास उलटत नाहीत तोवर पडळकरांनी हे वक्तव्य केल्याने पुन्हा राजकारण तापले आहे. तसेच अधिवेशनाचे पुढचे काही दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.