ठाणे – खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूल हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमधून झाला असून ठाण्यावर अपार प्रेम असलेले दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली. या उड्डाणपुलाच्या उभारणीत वेळोवेळी सगळ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा उड्डाणपूल उभा राहू शकला आहे. त्यामुळे कोणी श्रेयवादात पडू नये, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.
खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला त्यावेळी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. या पुलाच्या उभारणीत बराच कालावधी गेला असला तरीही त्यामुळे आता रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टळणार असल्याचे समाधान वाटत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी या फाटकाच्या ठिकाणी रेल्वे अपघातात आजवर मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
मध्य रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या या रेल्वे उड्डाणपुलासाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आला. रेल्वे रुळांवरील पुलाच्या भागाचे काम मध्य रेल्वेने, दोन्ही बाजूकडील पोहोच रस्ता आणि पादचारी पुलाचे काम ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, महापालिकेने पोहोच रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या अधिग्रहणासाठी ४१ कोटी रुपयेही अदा केले.
२००० साली या पुलाची मागणी सर्वप्रथम करण्यात आली होती. तेव्हापासून असंख्य अडथळ्यांची शर्यत पार पाडत, सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा उड्डाणपूल झाला, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. पुलाला मंजुरी २००८ मध्ये मिळाली होती, पण कामाला गती खऱ्या अर्थाने २०१४ नंतर आली, असेही ते म्हणाले. आधी खारेगावचं मैदान वाचवण्यासाठी आरेखन बदलण्यात आले. तर नंतर ४१ कोटी रुपये मफतलाल कंपनीला देऊन त्यानंतर या पुलाच्या पोहोच रस्त्यांचे काम पूर्ण केले गेले. या काळात अनेकांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानेच आज या पुलाचे काम पूर्ण झाले असून हे श्रेय एकट्याचे नसून सगळ्यांचे आहे, असेही ते म्हणाले.
कळवा-मुंब्रा येथील विकासकामांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमच झुकतं माप दिलं असून त्यांनी कधीही त्यात दुजाभाव केलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रश्नच नसून त्यामुळे लोकांचे प्राण वाचत आहेत हे जास्त समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि आपल्यात फार आधीपासूनच मैत्रीचा अदृश्य धागा असून तो आपण कायम जपला आहे. निधी मंजुरीसाठी कधीही एकनाथ शिंदे यांच्याकडे जावं लागलं नाही. सत्ताधारी कसा असावा, याचं ते उत्तम उदाहरण आहेत, अशा शब्दात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
जितेंद्र आव्हाड, श्रीकांत शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप
नाते जपायला परीपक्व असायला लागते, मात्र ते अजून परिपक्व झालेले नाहीत, त्यांचे रक्त सळसळते आहे, त्यामुळे आपल्याला बापाच्या भुमिकेत जाऊन त्यांनी समजावून घेतले पाहिजे असा सल्ला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. मात्र त्यावर पलटवार करीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मला परिपक्व व्हायचे नसल्याचे सांगत, मुलगा मोठा होत असेल त्याला यश मिळत असेल तर त्याचा त्रास बापाला होत असेल तर याला कोणते नाते म्हणायचे असा पलटवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना लगावला.
खारेगाव उड्डाणपुलावरुन श्रेयवादाच्या लढाईनंतर आघाडीचे सुतोवाच आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतांनाच अवघ्या काही क्षणात या आघाडीत पुन्हा ठिणगी पडल्याचे दिसून आले. आव्हाड यांनी या पुलासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांनीच पाठपुरावा केल्याचा उल्लेख करुन मंजुरी देखील त्यांनीच मिळवून दिली आहे. मात्र पुलाचे काम का लांबले याचे उत्तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील माहित असल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीपासून मी आघाडीचा धर्म पाळत आहे, राष्ट्रवादीच्या बाजूने आघाडी पक्की असून आता उर्वरीत निर्णय त्यांना घ्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय नरेश म्हस्के हे महापौर होत असतांना त्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणो झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता आम्ही ही निवड बिनविरोध केल्याची आठवण त्यांनी म्हस्के यांना करुन दिली.
दुसरीकडे आव्हाडांनी केलेल्या या हल्याला खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पलटवार केला. मला परिपक्व व्हायचे नसून मुलाच्या यशाने जर बापाला त्रस होत असेल तर त्या नात्याला काय म्हणावे असा टोला खासदार शिंदे यांनी आव्हाड यांना लगावला. विकासाचे राजकारण आम्हाला करायचे नाही, आणि आघाडीचा निर्णय हा केवळ शिवसेनेत आदेशानुसार घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीलाच आघाडी नसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. तर महापौर निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली होती. असे असतांनाही राष्ट्रवादीला महिला बालकल्याण समिती, प्रभाग समिती आणि परिवहनचे सदस्य दिले होते. त्या बदल्यात त्यांनी ही निवडणुक बिनविरोध करुन दिली होती, कदाचित आव्हाडांना त्याचा विसर पडला असेल म्हणून त्याची आठवण करुन देत असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकार्पण होण्याआधीच शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
उड्डाणपुलाचं लोकार्पण होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे काम पूर्णत्वास गेलं असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण व्हावं अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आज कार्यक्रम स्थळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद आव्हाड उपस्थित राहणार होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून ‘जितेंद्र आव्हाड तुम आगे बढो’च्या घोषणा दिल्या जात होत्या. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुलाचं लोकार्पण होण्याआधीच उड्डाणपुलावर गेले होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी येताच ते थेट आपली गाडी घेऊन उड्डाणपुलावरच गेले आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते स्वत: पायी चालत कार्यक्रमस्थळी आले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर जितेंद्र आव्हाड यांनी चतुराईनं ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’ऐवजी महाविकास आघाडीची घोषणा देण्याचं आवाहन केलं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणेत बदल करुन ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली.
भर कार्यक्रमात टोलेबाजी अन् कोपरखळ्या…
श्रेयवादाच्या लढाईमुळे कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आधीच जुंपलेली असताना नेत्यांनीही आपल्या भाषणात कोपरखळ्या आणि टोलेबाजी करत वातावरण चांगलंच गरम केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना कोविड नियमांची आठवण उपस्थितांना करुन दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील पालन करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
२००० सालापासूनच खारेगाव उड्डाणपुलासाठी शिवसेनेच्या नगरसेवकाकडून पहिला प्रस्ताव देण्यात आला होता असं सांगत राष्ट्रवादीच्या श्रेयवादाची हवाच शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी काढली. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघाला २ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला अशी कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मारली. मग जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या रोखठोक शैलीत फटकेबाजी केली. २००९ साली मी आमदार झालो. मात्र, विकास कामांसाठी कधीही निधी मागण्याची आवश्यकता भासली नाही. २००९ नंतर कळवा आणि मुंब्रा यांच्यात झालेले विकास कामे यातून फरक दिसून येईल. भास्कर नगर मधील रस्त्यासाठी विधानसभेत मांडल्यानंतर नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी त्या रस्त्याला स्थगिती देत येणार नसल्याचे सांगितले. २० वर्षानंतर हा रस्ता झाला. महापौरांनी मिशन कळवा, असे संबोधले मात्र, त्यांचे मिशन कळवा काय हे समजलं नाही. जयवंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करतील अशी सूचना केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या होत्या. महापौर नरेश म्हस्के तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका, असा टोला आव्हाड यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंची चतुराई
उड्डाण पुलाच्या कामात जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मोलाची. मात्र हा प्रकल्प होताना आलेल्या अडचणींचा व ते किती गरजेचे आहे, त्याचे गांभीर्य काय याबाबत रेल्वे प्रशासनाकडे श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. शिंदे आणि आव्हाड आमच्यात दोघांमध्ये दोस्ती आहे. आम्ही कधी एकमेकांविषयी मनात द्वेष ठेवत नाही. ते निवडणुकांच्या काळात ते त्यांच्या पक्षाची भूमिका आणि मी माझ्या पक्षाची भूमिका बजावत असतो. माझ्या मतदारसंघातील विकासकामांचे आकडे आणि तुमच्या मतरदारसंघातील काम बघा. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे नाव स्टेडीयमला देण्यासाठी लगेच सहमती दर्शवली. धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यासाठी एकमताने लढा दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच मिशन कळवानंतर तुम्ही लगेच मिशन वागळे याचा उल्लेख केला. त्यानंतर शिंदे यांनी, तुम्ही देखील मिशन वागळे राबवा मी तुम्हाला रोखणार नाही. मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांनी चिंता करू नये महाविकास आघाडी होणार आहे. आम्ही कधी कमिशनचा विचार न केला लोकांचे काम केले, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आज पार पडलेल्या या सोहळ्याला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेते आश्रफ शानू पठाण आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.