संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले
नागपूर: विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे.
राजभवनात कोणतं भूत आहे? विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या?, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधाने आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये, अशी टीका फडणवीस यांनी केली.
संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती राज्याचा दौरा करणार आहेत. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी छत्रपती यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते २८ मे रोजी मला भेटणार आहेत. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यात येईल, असं ते म्हणाले.