राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? फडणवीसांचा मलिकांना चिमटा
नागपूर/मुंबई : गोवा ड्रग्स क्रुझ पार्टी प्रकरण सुरू झाल्यापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. आजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला होता. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय, नवाब मलिक दिवसभर काही ना काही बोलत असतात. सध्या त्यांना दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं.
आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या; भाजपचा टोला
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी, शिवसेनेला खोचक सवाल विचारले आहेत. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का? असं भाजपनं विचारलं आहे.
राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी महिलांना असुरक्षित वाटत आहे त्यांना दिलासा मिळणार का? मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत जनतेच्या प्रश्नावर कधी पत्रकार परिषद घेणार का? असंही भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारलं आहे. या प्रकरणावरुन राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप लावले होते. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. बोगस जात प्रमाणपत्र, भ्रष्टाचार, निकाहनामा जारी करत वानखेडे कुटुंब बोगस असल्याचा आरोप केला होता.