अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला विमानाने मुंबईत; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला : फडणवीस
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांचे दावे खोडून काढण्यासाठी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कागदपत्रे सादर केली. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे खासगी विमानाने १५ फेब्रुवारीला मुंबईत आले होते, असा दावा केला आहे. यात त्यांनी पोलीसांचे दैनंदिन माहितीपत्र सादर केलं. यात कोणते मंत्री कधी आणि कुठे जाणार आहेत, याची माहिती त्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यात १७ फेब्रुवारी २०२१ ला ३ वाजता अनिल देशमुख सह्याद्रीवर येतील आणि जातील अशी माहिती देण्यात आली आहे. तसंच २४ फेब्रुवारीची देखील माहिती दिली आहे. अनिल देशमुख ११ वाजता मोटारीने निवास स्थान ते मंत्रालय आणि मंत्रालय ते निवासस्थान असे जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. पण गृहमंत्री गेले की नाही माहित नाही, असं फडणवीस म्हणाले. शरद पवारांना योग्य ब्रिफिंग दिली जात नव्हते. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. १५ तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावाही त्यांनी केला.
पवारांना टोला
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो नंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला असल्याने आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरु करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर पत्रकारांनी इंग्रजी इंग्रजी असा उच्चार केला. त्यावेळी फडणवीसांनी त्यांच्याइतकं माझं इंग्रजी चांगलं नाही, असेही फडणवीस म्हणाले.