स्पोर्ट्स

हेटमायरची फटकेबाजी तरीही दिल्लीविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका धावेने विजय

अहमदाबाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने विजय मिळवला. आरसीबीने एका धावेने विजय मिळवला असली तरी त्यांनी गुणतालिकेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला धक्का दिला आहे. शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार रिषभ पंत यांच्या अर्धशतकांनंतरही दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. हा बंगळुरूचा सहा सामन्यांत पाचवा विजय ठरला.

आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये आरसीबीच्या संघाने पाच विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात १० गुण जमा झाले आहेत. या १० गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत चेन्नईला धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या आयपीएलमध्ये पहिल्यांदा १० गुण पटकावण्याचा मानही आरसीबीने पटकावला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर असून दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना शिखर धवन (६) आणि स्टिव्ह स्मिथ (४) झटपट बाद झाले. तसेच पृथ्वी शॉ (२१) आणि मार्कस स्टोईनिस (२२) चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मात्र, पंत (४८ चेंडूत नाबाद ५८) आणि हेटमायर (२५ चेंडूत नाबाद ५३) यांनी दिल्लीला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीला जिंकण्यासाठी अखेरच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना पंत केवळ चौकार मारू शकला.

त्याआधी या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (१२) आणि देवदत्त पडिक्कल (१७) हे लवकर बाद झाले. यानंतर रजत पाटीदार (३१) आणि ग्लेन मॅक्सवेल (२५) यांनी बंगळुरूला सावरले. हे दोघे बाद झाल्यावर एबी डिव्हिलियर्सने बंगळुरूच्या डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे बंगळुरूने २० षटकांत ५ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती.

आरसीबीच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला सुरुवातीलाच शिखर धवन आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या पुरात दोन मोठे धक्के बसले. त्यावेळी पृथ्वी शॉ मात्र धडाकेबाज फलंदाजी करत होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पृथ्वीला यावेळी २१ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांच्यामध्ये ७८ धावांची अभेद्य भागीदारी पाहायला मिळाली. पण या दोघांनी फटकेबाजी करूनही दिल्लीच्या संघाला पराभव पत्करावा लागला.

दिल्लीच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दिल्लीचा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने यावेळी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आपल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आजच्या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माने देवदत्त पडीक्कलला बाद केले आणि दिल्लीला दुसरे यश मिळवून दिले.

आरसीबीने कोहली आणि पडीक्कल या दोघांनाही गमावल्यावर ग्लेन मॅक्सवेलने काही काळ चांगली फलंदाजी केली. पण मॅक्सवेलला यावेळी अमित मिश्राने बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स खेळायला आला आणि त्याने सर्व समीकरणेच बदलून टाकली. एबीने यावेळी सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावा घेतल्या. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याने जोरदार फटकेबाजी केली. एबीने यावेळी दिल्लीच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला. एबीने यावेळी ४२ चेंडूंत ३ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावांची तुफानी खेळी साकारली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button