राज्यात डेल्टा प्लसचे १० रूग्ण वाढले, आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना : टोपे
मुंबई : डेल्टा प्लस व्हेरिअंटने बाधित राज्यातील रूग्णांची संख्या सोमवारी १० ने वाढली आहे. एकाच दिवशी ही संख्या वाढल्याने शासनस्तरावरून खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी भीती न बाळगता सावधान राहावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
एका खासगी कार्यक्रमासाठी टोपे खामगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीसंदर्भात माहिती दिली. तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रूग्णांची संख्या ६६ होती. सोमवारी ती ७६ पर्यंत पोहचली आहे. ही वाढ मोठी आहे. त्यामुळे या व्हेरिअंटबाबत कुठेही काहीही आढळून आल्यास त्यावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. जिल्हास्तरावर असलेल्या प्रयोगशाळांना सर्व घटकांची तपासणी करण्याचे बजावण्यात आले आहे.
इंडियन कौन्सिल आँफ मेडिकल रिसर्चकडून त्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतही डेल्टा प्लसच्या विविध चाचण्या केल्या जात आहे. राज्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, कोरोनासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचे कसोशीने पालन करावे, असे आवाहन टोपे यांनी केले.