Top Newsस्पोर्ट्स

दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही पटकावलं अव्वल स्थान

दुबई : शार्दूल ठाकूरनं विजयासमीप आणून दिलेला सामना एका चुकीमुळे चेन्नई सुपर किंग्सला गमवावा लागला. चेन्नईच्या १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची दमछाक झाली होती. पण, १८व्या षटकात जीवदान मिळालेल्या शिमरोन हेटमारयनं दिल्लीला विजय मिळवून दिला. ‘टॉप’ च्या लढाईत दिल्लीनं बाजी मारताना २० गुणांसह अव्वल स्थान पक्के केले. अखेरच्या चेंडूपर्यंत या सामन्यात चुरस पाहायला मिळाली. अखेर दिल्लीने ३ गडी राखून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला मात देत सामना जिंकला.

चेन्नई सुपर किंग्सची सलामीवीची जोडी फॅफ ड्यू प्लेसिस (१०) व ऋतुराज गायकवाड ( १३ ) पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये माघारी परतली अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांची दैना उडाली. महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी चेन्नईचं विकेट पडणे थांबवले, परंतु त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले. फॅफ व ऋतुराज या जोडीनं यंदाच्या आयपीएलमध्ये मिळून ६००+ धावा केल्या आहेत आणि चेन्नईकडून असा पराक्रम करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे. मात्र, आजच्या सामन्यात ही जोडी अपयशी ठरली. ६२ धावांत चार फलंदाज माघारी परतल्यामुळे महेंद्रसिंग धोनीला लवकर मैदानावर उतरावे लागले.

धोनी व अंबाती रायुडू ही अनुभवी जोडी सावध खेळ करताना दिसली. धोनीचा बचावात्मक खेळ कंटाळवाणा वाटत होता, परंतु चेन्नईसाठी आता विकेट टिकवून खेळणं महत्त्वाचे होते. रायुडूनं १९व्या षटकांत काही फटके मारले, परंतु त्यानं भरपाई होण्यातली नव्हती. त्यानं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. अखेरच्या षटकात आवेश खाननं ही भागीदारी तोडताना २७ चेंडूंत १८ धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. चेन्नईला ५ बाद १३६ धावांवरच समाधान मानावे लागले. रायुडू ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला.

पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी झटपट २४ धावा जोडल्या, परंतु दीपक चहरनं ही जोडी तोडली. पृथ्वी १८ धावांवर माघारी परतला. दीपकनं तिसऱ्या षटकात यश मिळवले असले तरी पुढील षटकात धवननं त्याची शाळा घेतली व २१ धावा कुटल्या. त्यात दोन षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. मात्र, पुढील षटकात जोश हेझलवूडनं दिल्लीला धक्का देताना श्रेयस अय्यरला ( २) बाद केले. बर्थ डे बॉय रिषभ पंतनं छोटेखानी खेळी केली, परंतु त्यात जबरदस्त धमाका दिसला. दोन वेळा तो बाद होता होता थोडक्यात वाचला आणि दोन्ही वेळेस गोलंदाज रवींद्र जडेजा होता. पण, अखेर जडेजानंच ९व्या षटकात रिषभला ( १५) बाद केले.

१५ व्या षटकात शार्दूल ठाकूरनं दिल्लीला दणके दिले. पहिल्या चेंडूवर त्यानं आर अश्विनला त्रिफळाचीत केलं. तिसऱ्या चेंडूवर शिखर धवनसाठी जोरदार अपील झालं अन् मैदानावरील अम्पायरनं त्याला बाद दिले. पण, डीआरएसमध्ये तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाले. शार्दूलनं प्रयत्न सोडले नाही आणि त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शिखरला बाद करून दिल्लीची अवस्था ६ बाद ९९ अशी केली. शार्दूलनं १३ धावांत २ विकेट्स घेतल्या.

दिल्लीला तीन षटकांत २८ धावा करायच्या होत्या. तेव्हा धोनीनं त्याचा ट्रम्प कार्ड ड्वेन ब्राव्होला मैदानावर उतरवले. पण, त्यानं षटकाची सुरुवात वाईडने केली. आता तो वाईड होता की नाही हा वादाचा मुद्दा होता. पुढच्याच चेंडूवर शिमरोन हेटमारयनं सरळ दिशेनं चौकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर बदली खेळाडू के गौथमनं सोपा झेल सोडूला अन् हेटमायरला आणखी एक चौकार मिळाला. ब्राव्होच्या त्या षटकात १२ धावा आल्या. अखेरच्या षटकात ६ धावांची गरज असताना हेटमायरनं पहिल्याच चेंडूवर दोन धावा काढल्या. पुढील चेंडूवर धोनी यष्टींजवळ येऊन उभा राहिला, परंतु ब्राव्होच्या वाईड चेंडूवर दिल्लीला दोन धावा मिळाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button