मुंबई : मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकर यांनी मजूर मतदारसंघातून अर्ज भरला होता. आपण मजूर असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. मलिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. निवडून आलेल्या सभागृहातील सदस्यांना शपथेवर माहिती देणे बंधनकारक आहे. ती माहिती सत्य असायला हवी. एखादा सदस्य शपथेवर खोटे बोलून सभागृहात आला असल्यास त्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न मलिक यांनी केला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे शपथेवर सांगितले, शपथेवर खोटे बोलणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा फर्जीवाडा असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी दरेकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण, मजूरच कशाला माथाडी आणि शेतकरी नेत्यांची व्याख्या करावी लागणार आहे. त्यामुळे सभागृहात एकदा चर्चा ठेवाच, असा प्रतिटोला दरेकरांनी लगावला.
हा वादाचा विषय टाळण्याच्या प्रयत्नात असलेले सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र दरेकर यांच्या उत्तराने एकप्रकारे नि:श्वास सोडला. मलिक यांनी उपस्थित केलेल्या विषयाची सहकार खात्याकडून चौकशी सुरू आहे. त्याचे काय होते ते पाहून पुढचा निर्णय घेऊ, असे सांगत सभापतींनी पुढील कामकाज पुकारले.
मलिक यांचा बाऊंसर दरेकर यांनी चांगलाच परतवला. मलिक यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचे मी स्वागत करतो. त्यांनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. शेतकरी नसलेले शेतकरी नेते होतात, माथाडी नसलेले माथाडी नेते होतात, हेही कळेल. यासंदर्भात सूचना अस्पष्ट असल्याने अधिकारी वर्ग गोंधळात असतो, त्यामुळे एक चर्चा ठेवा, अशी सभापतींकडे त्यांनी मागणी केली.