Top Newsराजकारण

वानखेडे पिता-पुत्राची बेकायदेशीर कामे बाहेर येऊ नयेत म्हणून अब्रुनुकसानीचा दावा : नवाब मलिक

न्यायालयात ९५ पानांचे प्रतिज्ञापत्र नव्याने दाखल

मुंबई : आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला हा निव्वळ वानखेडे पिता-पुत्रांची बेकायदेशीर कामं उघड करण्यापासून रोखण्यासाठीच दाखल करण्यात आला. तसेच आपल्या जावयाविरोधातील केस सुरू होण्याआधीपासूनच आपण एनसीबीच्या मनमानी कार्यपद्धतीविरूद्ध बोलत होतो, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हायकोर्टात केला आहे.

नवाब मलिक यांनी आता एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मलिकांचे हे सर्व आरोप हे चुकीचे आणि निराधार आहेत. त्यामुळे आमची बदनामी होत असून कुटुंबियांची प्रतिमाही मलिन होत आहे. सोशल मीडियातून आम्हाला धमक्या मिळत असून आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचं सांगत ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा हायकोर्टात दाखल केला आहे. त्यावर उत्तरादाखल नवाब मलिक यांनी ९५ पानांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात नव्यानं सादर केलं आहे.

न्यायालयाची दिशाभूल करून आणि अनुकूल आदेश मिळवून आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासाठी आणि समीर वानखेडे यांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी उघड करण्यापासून आपल्याला रोखण्याच्या हेतूनंच हा खटला दाखल केल्याचं मलिक यांनी आपल्या उत्तरात म्हटलेलं आहे. वानखेडे पिता-पुत्रांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी दडपण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला आहे. आपण केलेली सोशल मीडियावरील विधानं वानखेडे कुटुंबाची बदनामी करणारी किंवा अपमानास्पद नव्हती. परंतु ती वानखेडे यांच्या बेकायदेशीर कृत्यां संबंधित होती. त्यामुळे आपल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणतेही निर्बंध लादता येऊ शकत नाहीत, असे मलिक यांनी यात स्पष्ट केलं आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून आपल्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर आपण सूड उगवण्यासाठी म्हणून ही विधानं करत असल्याचा आरोप होतोय. मात्र, आपल्या जावयाला अटक होण्याच्या आधीपासूनच आपण एनसीबीच्या मनमानी कार्यपद्धतीविरोधात बोलत होतो, असं मलिक यांनी या आरोपाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

एनसीबी अमली पदार्थ तस्करांना शोधण्यापेक्षा प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करून प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वानखेडे मुस्लिम आणि हिंदू असं दुहेरी जीवन जगत होते आणि त्यांनी बेकायदेशीरपणे अनुसूचित जाती (एससी) श्रेणी अंतर्गत सरकारी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे खरे अनुसूचित जातीचे उमेदवार या नोकरीच्या संधीपासून वंचित राहिले. वानखेडे यांनी बेकायदेशीरपणे सरकारी नोकरी कशी मिळवली? हे दाखवण्यासाठीच त्यांच्या धर्माचा उल्लेख आपण उपलब्ध रेकॉर्डवरून केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. आपण केलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे विरोधात अखेर एनसीबीला योग्य कायदेशीर पावलं उचलण्यास मदत झाल्याचंही नवाब मलिक यांनी यात नमूद केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button