स्पोर्ट्स

दीपक चहरची अफलातून गोलंदाजी; चेन्नईसमोर पंजाबचे लोटांगण

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या पर्वातील आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने १५.४ षटकातच ४ गडी गमावून पूर्ण केलं. पंजाबच्या बड्या फलंदाजांना चेन्नईच्या दीपक चहर या युवा गोलंदाजाने पुरतं हैराण केलं. त्याने आपल्या ४ षटकांत पंजाबच्या ४ बॅट्समनला तंबूत धाडलं. तसंच २०० वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मॅच जिंकवून खास गिफ्टही दिलं.

चेन्नईच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे नावाजलेले फलंदाज झटपट बाद झाले आणि त्यांची ५ बाद २६ अशी बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे पंजाबला या सामन्यात धोनीच्या चेन्नईपुढे १०७ धावांचे माफक आव्हान ठेवता आले आहे. दीपकने मयांकनंतर ख्रिस गेल, दीपक हुडा आणि निकोलस पुरन यांनाही बाद करत पंजाबचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर कर्णधार लोकेश राहुलला यावेळी फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले आणि धावचीत होत त्याने आत्मघात केला. पण त्यानंतर पंजाबच्या संघातील युवा फलंदाज शाहरुख खानने पंजाबला तारले आणि त्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पंजाबच्या संघासाठी यावेळी चार विकेट्स पटकावणारा दीपक चहर हा कर्दनकाळ ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण त्याच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे फलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. दीपकला यावेळी सॅम करन, रवींद्र जडेजा, मोइन अली आणि ड्वेन ब्राव्हो यांची चांगली साथ मिळाली. अली आणि ब्राव्हो यांनी यावेळी विकेट्सही पटकावल्या.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज पुन्हा एकदा पंजाबचे बॅट्समन षटकारांचा पाऊस पाडतील, असा क्रिकेटप्रेमींचा अंदाज होता. परंतु पंजाबच्या डावाची खराब सुरुवात झाली. दीपक चहर या युवा गोलंदाजाने पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालला शानदार इनस्विंग टाकून क्लिन बोल्ड केलं तर पुढे नियमित अंतराने त्याने पंजाबला धक्के दिले. दीपकने निर्धारित ४ ओव्हर्समध्ये १ ओव्हर निर्धाव टाकत केवळ १३ रन्स देऊन ४ फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याने फेकलेल्या २४ चेंडूंमधले १८ चेंडू निर्धाव होते. आयपीएलच्या इतिहासातली दीपक चाहरची ही आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ बोलिंग आहे. याअगोदर त्याने २०१८ मध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध निर्धारित ४ ओव्हर्समध्ये १५ रन्स देऊन ३ बळी मिळवले होते.

चेन्नईची गुणतालिकेत भरारी

चेन्नई सुपर किंग्सने फक्त पंजाबवर मोठा विजय मिळवला नाही, तर गुणतालिकेत त्यांनी मोठी भरारी घेतली. चेन्नईच्या संघाने यावेळी विजयाचे खाते उघडले आणि त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. चेन्नईसाठी हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला, यासह चेन्नईच्या संघाने गुणतालिते आपले खाते उघडले. पण चेन्नईने यावेळी पंजाबवर मोठ्या फरकाने विजय साकारला आणि याचाच फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत मोठा धक्का दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button