इतरफोकस

दाजी म्हात्रे म्हणजे वाडे शहराचा चालता – बोलता इतिहास !

कृष्णकांत कोंडलेकर यांचे गौरवोद्गार; विविध उपक्रमांनी दिवंगत बळीराम (दाजी) म्हात्रे यांना अभिवादन

वाडा : आपल्या जीवनात वाडे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात हिरीहिरीने भाग घेणारे दिवंगत बळीराम म्हात्रे म्हणजे वाडे शहराचा चालता बोलता इतिहास होते, असे गौरवोद्गार शिवसेनेचे ज्येष्ठ कामगार नेते कृष्णकांत कोंडलेकर यांनी केले आहे. रविवारी (दि. 20) रोजी वाडा येथे दिवंगत बळीराम (दाजी) म्हात्रे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दाजी म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून चांगला पायंडा पाडला असल्याचेही यावेळी बोलताना श्री कोंडलेकर यांनी सांगितले. तर वाडे शहरातील गणपती व आंबा माता मंदिरांची स्थापनेपासून काळजी घेणाऱ्या दाजी म्हात्रे यांचा स्मृतिदिन मंदिराच्या वर्धापन दिनाच्या दिवशी येणे, हा विलक्षण योगायोग असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

दरम्यान दाजी म्हात्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाडे शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाडे शहरातील पंचवटीनाका परिसराचे बळीराम यशवंत तथा दाजी म्हात्रे चौक असे नामकरण करण्यात आले असून येथील नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जेष्ठ कामगार नेते आणि समाजश्रेष्ठी कृष्णकांत तथा दादासाहेब कोंडलेकर यांच्या हस्ते झालेल्या नामकरण सोहळ्यात मुंबई मनपाचे मा. नगरसेवक परशुराम कोपरकर, प्रसिद्ध वास्तुविशारद भाई महाजन, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, दत्तात्रय यशवंत तथा काका म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. डाॅ सुधीर म्हात्रे यांनी यावेळी आरोग्य सेवेबद्दल विस्तृत माहिती दिली, तर नितीनभाऊ म्हात्रे यांनी आभार मानले. कैलास म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

साई होमिओपॅथी कॉलेज व सद्गुरू नित्यानंद होमिपॅथी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दुपारी चार ते रात्री दहा दरम्यान श्री गणपती-अंबामाता मंदिरात भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. प्रसाद दिलीप सोनटक्के यांच्या हस्ते महापुजा पार पडली. याप्रसंगी आरती, होम आणि प्रसाद वाटपासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button