क्रूझ ड्रग्स प्रकरण : पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी ५ लाखांची ऑफर – हॅकर मनीष भंगाळे
जळगाव : मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे मोबाईल सीडीआर आणि प्रभाकर साहील नावाने डुप्लिकेट सीम कार्ड काढण्यासाठी, आपल्याला अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोन जण जळगावात येऊन भेटले. एवढेच नाही, तर यासाठी त्यांनी आपल्याला ५ लाखांची ऑफरही दिली होती, असा खळबळजनक दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी बुधवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. तसेच, यासंदर्भात आपण मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जळगावमध्ये ६ ऑक्टोबरला भेटलेल्या अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्तींनी माझ्याकडे पूजा ददलानीच्या नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरचा सीडीआर काढून मागितला होता. अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोघे मला भेटले आणि त्यांनी सीडीआर काढून मिळेल का? असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असणारा नंबर दाखवला. एक व्हाट्सअॅप चॅटचा बॅकअपही त्यांनी मला दाखवला. जो आर्यन खान नावाने सेव्ह होता. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर आहे, असा माझा संशय असल्याचे भंगाळे याचे म्हणणे आहे.
हे काम केले तर तुम्हाला ५ लाख रुपये मिळतील असे म्हणत, त्यांनी मला अॅडव्हान्स १० हजार रुपये दिले. जाताना त्यांनी मला एक नंबर दिला, जो ट्रूकॉलरवर सॅम डिसुझा या नावाने दिसतो. त्या दोघांनी प्रभाकर साईल या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का? असेही विचारले, असा दावाही भंगाळे यांनी केला आहे.
प्रभाकर साईल याला टीव्हीवर पाहिल्यानंतर मला या गोष्टी लक्षात आल्या, असे भंगाळे यांनी म्हटले आहे. आर्यन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मला ५ लाखांची ऑफर होती, असे मनीष भगाळे यांचा दावा आहे. याबाबत त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून, चौकशीची मागणी केली आहे.