मुंबई : पुण्यापाठोपाठ मुंबईतही गणेशोत्सव काळात जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील ९ दिवस सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
पुण्यातही जमावबंदी
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत कलम १४४ लागू असेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी ७ हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.