राजकारण

भांडूपच्या अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा : आशिष शेलार

मुंबई: भांडूपमध्ये चार बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याची वैद्यकीय चौकशी निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे. हा एक प्रकारचा घोटाळाच असून या प्रकरणात अनेक बाबींची लपवाछपवी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची फौजदारी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच एवढी मोठी घटना घडल्यानंतरही पालकमंत्री आदित्य ठाकरे अजूनही रुग्णालयात आले नाहीत. ते केवळ वांद्रे-वरळी सिलिंकवर लाईटींग करण्यात मग्न आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला.

मुंबई महापालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात सलग ४ नवजात बालकांचा मृत्यू झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घटना उघड करताच खळबळ उडाली आहे. आज भाजप नेते आमदार आशिष शेलार आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन घटना स्थळाची पाहणी करुन डॉक्टरांकडून परिस्थितीची माहिती घेतली.

ही घटना जेवढी दुर्दैवी आहे तेवढीच संतापजनक आहे. चार निष्पाप बालकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला ही घटना मुंबई महापालिकेच्या सत्ताधीशांना याची माहिती नव्हती. जेव्हा विरोधी पक्षांनी ही बाब विधानसभेत मांडली तेव्हा ही घटना पालिकेला समजली. आता त्याची चौकशी करण्यात येत असली तरी सदर रूग्णालय पालिकेचे, त्याची चौकशी करणारे ही पालिकेच्या सायन रुग्णालयातील डॉक्टर आहेत. त्यामुळे पालिकेच्या यंत्रणेची पालिकाच निष्पक्षपाती चौकशी कशी करणार? म्हणून त्रयस्थांमार्फत ही चौकशी झाली पाहिजे, असं शेलार म्हणाले.

या रुग्णालयातील एनआयसीयु (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) हा महापालिका चालवत नाही. त्याचे कंत्राट मे. इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड खासगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. यासाठी या संस्थेला मुंबई महापालिकेने ३ वर्षांसाठी ८ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. हा एक घोटाळा आहे. कारण या संस्थेला जेव्हा स्थायी समितीने कंत्राट दिले त्यावेळी केवळ एकच कंपनी आली आणि तिला काम देण्यात आले. त्यामुळे हा एक घोटाळा आहे, असा दावा त्यांनी केला.

या प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे / बिघाडामुळे आणि अथवा अन्य कारणामुळे चार दुर्दैवी बालकांचा जंतूसंसर्गाने झाला आहे. तसेच ही घटना घडत होती तेव्हा या विभागात पालकांना जाऊन दिले जात नव्हते. त्या विभागात पाणी साचले होते. याबाबींची चौकशी वैद्यकीय चौकशीत कशी होणार? त्यामुळे या प्रकरणी पोलीसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, अधिवेशन सुरु असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. अशावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने या रुग्णालयातील घटनेची दखल घेऊन प्रत्यक्ष येऊन पाहणी करण्याची गरज होती. मात्र ते आले नाहीत. वरळीच्या राजीव गांधी सागरी सेतूला दिव्यांची रोषणाई करण्यात ते मग्न आहेत. इथे गरिबांच्या बालकांचा मृत्यू होत असताना वरळीत कसली रोषणाई करताय? असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button