चंदीगड : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याला रविवारी हरियाणातील हांसी येथे पोलिसांनी अटक केली. युवराजनं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यावर जातीवाचक टिप्पणी केली होती आणि त्याविरोधात हांसी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. त्यानं ही टिप्पणी मागच्या वर्षी रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅट दरम्यान केली होती.
हांसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टानं युवराजला जामिन दिला होता. हांसी पोलिसांनी औपचारिकता म्हणून त्याला अटक केली. यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि नंतर त्याला सोडण्यात आले. युवराजसह सुरक्षारक्षक आणि ४-५ स्टाफ व वकील होते.
युवराज सिंगच्या विरोधात हरयाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. २०२० च्या इंस्टाग्राम लाईव्ह सत्रात वर्ल्ड कप विजेत्या युवीनं जातीवाचक टिप्पणी केली होती. त्याची ही टिप्पणी दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याबाबत नंतर युवीनं माफीही मागितली होती.
हरयाणामधील हिसार येथील वकिलांनी ८ महिन्यांपूर्वी पोलिस स्थानकात युवीविरोधात तक्रार दाखल केली होती. इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार ८ महिन्यांनंतर हरयाणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर चॅट करताना त्यानं चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला ‘भंगी’ असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.