‘क्रिकेट गुरु’ वासु परांजपे यांचे निधन
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला मुंबईने अनेक हिरे दिले. यात सुनील गावस्करांपासून तेंडुलकर ते आता रोहित शर्मा अशा अनेकांचा समावेश आहे. असेच एक दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे आज हे जग सोडून निघून गेले आहेत. ते ८२ वर्षांचे होते. वासु परांजपे यांचा जन्म २१ नोव्हेंबर, १९३८ रोजी गुजरातमध्ये झाला होता. १९५६ ते १९७० दरम्यान मुंबई आणि वडोदरा संघासाठी २९ प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या वासु यांनी २३.७८ च्या सरासरीने ७८५ धावा केल्या होत्या. तर नऊ विकेटही मिळवल्या होत्या. त्यांच्या काळात ते मुंबईत दादर युनियन संघासाठी खेळत. त्यावेळी त्यांचा संघ सर्वात ताकदवर संघ मानला जात. त्यांचा मुलगा जतिन परांजपे हा देखील भारतासाठी खेळला असून नॅशनल सिलेक्टरही राहिला आहे.
वासु यांनी भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावं सामिल आहेत. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासु यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर रवी शास्त्री, विनोद कांबळीस, अनिल कुंबळे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत ट्विट केलं आहे.
सुनील गावस्कर यांना सर्वजण सनी या निकनेमने बोलावतात. हे नाव वासु परांजपे यांनीच दिलं होतं. वासु परांजपे क्रिकेटसोबत बाकी गोष्टीतही हुशार होते. त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना खासगी जीवनातही मदत केली आहे. संदीप पाटील यांच्या विवाहावेळी मुलीकडचे मान्य होत नव्हते. त्यावेळी वासु यांनी मध्यस्थी करुन हे लग्न घडवून आणलं होतं.