कोरोनाचा प्रकोप सुरूच! देशात एका दिवसात पुन्हा ४ लाखांहून नवीन रुग्ण
नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असून रोज मोठ्या संख्येने रूग्ण आढळून येत आहे. गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाच्या चार लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर तब्बल ४ हजार ९२ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आकडेवारीवरून असे समोर आले की, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा हा विक्रम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४ लाख ३ हजार ७३८ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा वाढून तो २ कोटी २२ लाख ९६ हजरांवर पोहोचला आहे तर आतापर्यंत एकूण २ लाख ४२ हजार ३६२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असताना देशात सध्या ३७ लाख ३६ हजार ६४८ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. या काळात दिलासादायक बाब म्हणजे १ कोटी ८३ लाख १७ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १६ कोटी ९४ लाख ३९ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.