आरोग्य

कोरोनाचा कहर थांबेना! देशात २४ तासात २६२१ रुग्णांचा मृत्यू, ८ राज्यांतील परिस्थिती गंभीर

नवी दिल्ली : डबल म्युटेशनसह कोरोनाच्या विविध स्ट्रेनमुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून, रुग्णवाढही वेगाने होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,४६,७८६ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक असून, परिस्थिती बिकट झाल्याचंच चित्र आहे. रुग्णावाढीबरोबरच देशात मृत्यूचं थैमानही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. देशात २४ तासांत अडीच हजारांहून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून १,८९,५४९ वर पोहोचली आहे. देशात २५,४३,९१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे संख्या एकूण बाधितांच्या १५.३ टक्के आहे. याआधी गुरुवारी कोरोनाचे नवे ३.३२ लाख रुग्ण आढळले होते. तर, २२५० जणांचा मृत्यू झाला होता. भारतानं दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकलं असून भारत जगभरात पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

कोरोना संक्रमित रुग्णांच्या बरं होण्याचा दर ८३.५ इतका झाला आहे. तर, कोरोनानं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा दर घटून १.१ टक्के इतका झाला आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ७७३ रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.. यानंतर दिल्ली ३४८, छत्तीसगड २१९, यूपी १९६, गुजरात १४२, कर्नाटक १९०, पंजाब ७५ आणि मध्य प्रदेशमध्ये ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच २०१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण मृतांच्या संख्येपैकी ७६.९८ टक्के इतका आहे.

६० टक्क्याहून अधिक रुग्ण ७ राज्यांमध्ये!

महाराष्ट्रात सर्वाधिक ६६,८३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ३२८४४, दिल्लीमध्ये २४३३१, कर्नाटक २६९६२, केरळ २८४४७, राजस्थान १५३९८ आणि छत्तीसगडमध्ये १७३९७ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांच्या संख्येपैकी ६०.२४ रुग्ण याच सात राज्यांमधील आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून देशात होत असलेली रुग्णवाढ शनिवारी नव्या पातळीवर पोहोचली. एका दिवसांत आढळून आलेल्या जागतिक रुग्णवाढीचा विक्रम मोडीत निघाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, ही माहिती सगळ्यांनाच काळजीत टाकणारी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात २ हजार ६२४ जणांचे प्राण करोनानं हिरावून घेतले आहेत. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात २४ तासांच्या काळातच २ लाख १९ हजार ८३८ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या २५ लाख ५२ हजार ९४० रुग्ण उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button