नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील लाखो कुटुंबांचे भविष्य नष्ट केले आहे. कोणाचा मुलगा, कोणाचा पती, कोणाचा बाप, भाऊ, बहीण असे आप्तेष्ठ कोरोनाने हिरावले आहेत. कोरोना महामारीला दोन वर्षे होत असताना या महामारीने केलेले दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार कोरोनाने भारतीयांची दोन वर्षे कमी केली आहेत.
इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पॉपुलेशन स्टडीज (आयआयपीएस) नुसार २०१९ मध्ये भारतीय पुरुषांचे सरासरी आयुष्य हे ६९.५ वर्षे होते. २०२० मध्ये कमी होऊन ते ६७.५ वर्षांवर आले आहे. याचप्रमाणे महिलांचे आयुष्य हे ७२ वर्षे होते ते आता ६९.८ वर्षांवर आले आहे. आयआयपीएसचे असिस्टंट प्रोफेसर सूर्यकांत यादव यांचा हा स्टडी बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये छापून आला आहे.
गेल्या दोन वर्षांत ३५ ते ६९ वर्षे वयोगटामध्ये मृत्यूदर जास्त होता. त्याचा परिणाम या आकडेवारीवर झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदर कमालीचा वाढला आहे.
मार्च २०२० ते आतापर्यंत चार लाख मृत्यू झाले आहेत. डेटा स्पेशालिस्टनी भारतात यापेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. याशिवाय कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस पोर्टलद्वारे देखील अभ्यास करण्यात आला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदरात मोठी वाढ झाल्याचे यामध्ये दिसले आहे. या तुलनेत भारत मध्यावर आहे. इग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशांत हे आयुष्य १ वर्षाने घटले आहे. तर स्पेनमध्ये सर्वाधिक २.२८ वर्षांची घट झाली आहे.