आरोग्य

१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

नवी दिल्ली : येत्या १ एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती.

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय 44 वर्षे 3 महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.

मुंबईत सध्या सुरु असणारी कोरोना लसीकरण केंद्रे ही 8 ते 12 तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. ती 24 तास कार्यरत झाल्यास दिवसाला एक लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे. आणखी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठवण्यात आला आहे. खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे 24 तास सुरु ठेवण्यास नुकतीच मुभा मिळाली आहे. (Corona vaccine for everybody above 45 years of age says Prakash Javadekar)

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. ही बाब लक्षात घेतल्यास तसेच दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिनाभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल.

ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र सरकारद्वारे परवानगी मिळाली आहे. परंतु ज्यांनी अद्याप लसीकरण केंद्र सुरू केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button