२८ एप्रिलपासून सुरु होणार लसीकरणासाठी नोंदणी
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळं आता या लसीकरणासाठी लोकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. या वयोगटातील नागरिकांचं प्रमाण अधिक असल्यानं आता लसीकरणासाठी नोंदणीबाबतही चर्चांना सुरुवात झाली आहे. लसीकरणासाठी नोंदणीला शनिवारी म्हणजे २४ एप्रिलपासून सुरुवात होणार अशी चर्चा होती. पण सरकारनं आता २४ नव्हे तर २८ एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कोरोनाच्या लसीकरणासाठी १८ वर्षावरील सर्वांना सरकारनं पात्र केल्यानंतर आता यासाठी तयारी सुरू झाली आहे. नागरिकांमध्येही यासाठी उत्सुकता आहे. लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर तसंच आरोग्यसेतू अॅपद्वारे नोंदणी करता येणार आहे. १ मे पासून सुरू होणाऱ्या या लसीकरणासाठी शनिवारी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार, असं वृत्त अनेक ठिकाणी झळकलं. अनेक संकेतस्थळांनीही तसं वृत्त दिलं. मात्र आता सरकारनंच ही तारीख चूक असल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत सरकारच्या MyGovIndia या ट्विटर हँडलवर सरकारनं ही माहिती दिली आहे. २४ एप्रिलला नोंदणी सुरू होणार ही अफवा असून प्रत्यक्षात २८ एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.