युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, १० लाख नवे रुग्ण
नवी दिल्ली : कोरोनाचा धोका युरोपमध्ये पुन्हा वाढला वाढला आहे. गेल्या आठवड्यात 10 लाख नवीन रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, 27 देशांत कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
एका आठवड्यात युरोपमध्ये कोरोना विषाणू बाधितांचा आकडा 10 लाखांपर्यंत पोहोचला असून हा आकडा वाढण्याची शक्यता अधिक आहे. वाढलेला कोरोना बाधितांचा आकडा हा मागील आठवड्यापेक्षा 9 टक्के जास्त आहे.
अहवालानुसार, युरोपमध्ये सलग 6 आठवड्यांपर्यंत कोरोना विषाणूच्या बाबतीत घट झाली आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून त्यामध्ये अचानक वाढ झाली आहे. ज्यामुळे युरोपमधील देशांमध्ये चिंता वाढू लागली आहे. इटलीच्या मिलान उपनगराचा बोलेटा या विषाणूच्या सर्वाधिक बाधित ठिकाणी होत आहे. नर्सरी आणि प्राथमिक शाळेत संसर्गाचा वेगवान प्रसार झाला आहे. काही दिवसांत 45 विद्यार्थी आणि 14 कर्मचारी कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत.
युरोपमधील 27 देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूचा ब्रिटीश स्ट्रेनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. जागतिक आरोग्य संघटना यावर लक्ष ठेवून आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन, डेन्मार्क, इटली, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स, इस्त्राईल, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांसह किमान दहा देशांमध्ये या नव्या कोरोना स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये सापडलेल्या अत्यंत प्राणघातक विषाणूचा हाच प्रकार असल्याचे लॅबमधील तपासणीत स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा धोका अधिक प्रमाणात असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, भारतातील आठ राज्यांत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.