आरोग्यराजकारण

राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला ५० लाखांचे बक्षीस

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत. त्यामुळे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली·

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना, गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस – पंधरा (२५१५) व तीस-चोपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button