नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचा आकडा हा २,९९,७७,८६१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२,६४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,१६७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ३,८९,३०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी आता केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या ४३ पट जास्त आहे असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. तसेच योगी सरकार मृत्यूंचे आकडे नाही तर स्वत:चं तोंड लपवत आहे अशी बोचरी टीका ही अखिलेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “माहितीच्या आधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, ३१ मार्च २०२१ पर्यंत ९ महिन्यांत उत्तर प्रदेशातील २४ जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा ४३ पट जास्त आहे. त्यामुळे भाजपा सरकार मृत्यूची आकडेवारी नव्हे तर आपलं तोंड लपवत आहे, असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सूचना के अधिकार के तहत मिली जानकारी से ये भंडाफोड़ हुआ है कि 31 मार्च, 2021 तक के कोरोनाकाल में 9 महीनों में उप्र के 24 ज़िलों में मृत्यु का आँकड़ा सरकार द्वारा दिये गये आँकड़ों से 43 गुना तक अधिक है।
भाजपा सरकार मृत्यु के आँकड़े नहीं दरअसल अपना मुँह छिपा रही है।#NoMoreBJP
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) June 22, 2021