मुंबई : राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात बुधवारी १४४ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. तसंच ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येची ही वाढ धडकी भरवणारी ठरत आहे. त्यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
राज्यात बुधवारी दिवसभरात ५३३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा आता ८७ हजार ५०५ वर पोहोचला आहे. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा एकूण आकडा ७९७ इतका झाला आहे. तर ३३० जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राज्यात बुधवारी १४४ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत आणि यात तब्बल १०० रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. नागपुरात ११ तर ठाणे आणि पुणे मनपामध्ये प्रत्येकी ७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
मुंबईची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल
मुंबईत बुधवारी तब्बल १५ हजार १६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या आकडेवारीपेक्षा तब्बल ३९ टक्के रुग्णवाढ आज मुंबईत नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईची दैनंदिन रुग्णसंख्या २० हजाराच्या घरात गेल्यानंतर शहरात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, असं विधान मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल चहल यांनी केलं होतं. त्यामुळे रुग्णवाढ पाहता मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं होतंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक करणार : टोपे
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी तूर्त पूर्ण लॉकडाऊन होणार नाही. मात्र, निर्बंध आणखी कडक केले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना विषाणू रोखण्यासाठी गर्दी थांबविणे आवश्यक आहे. आजच निर्बंध आणावेत, असेही नाही. मात्र, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून नंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार असून त्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचणी देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही तिसर्या लाटेची सुरुवात मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक झाली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे पुन्हा अर्थचक्रावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन नको, अशा निष्कर्षाप्रत राज्य सरकार आल्याचे सांगण्यात येते. आजच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे. कोरोना चाचण्यांची संख्या आता वाढणार आहे. त्यामुळे केवळ आरटीपीसीआर केली तर भार जास्त येईल म्हणून अँटिजेन टेस्ट देखील करण्यात येणार आहे.अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर होणार नाही. किऑस्कद्वारे देखील अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांचा असणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
आता लॉकडाऊन हा शब्द प्रयोग करायचा नाही किंवा १०० टक्के बंद करण्याची निश्चितपणे गरज नाही. पण ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळून इतर म्हणजे बिगर अत्यावश्यक सेवा आहेत त्या थांबवण्याचा विचार सुरू आहे. विषाणूवर नियंत्रण मिळवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत गर्दी थांबवणे गरजेचे आहे, असे मत प्रशासन आणि कृती दलाने व्यक्त केल्याचे टोपे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील कोविड सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देश
मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून २६ डिसेंबर रोजी ६४ असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये २७ डिसेंबर रोजी ७२, २८ डिसेंबर रोजी ८३ व त्यानंतर २९ डिसेंबर रोजी १६५, ३० डिसेंबर रोजी २६६, ३१ डिसेंबर रोजी २६५, १ जानेवारी रोजी ३२२ तर २ जानेवारी रोजी ५२३ अशी मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने बैठक घेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने बंद केलेली कोविड केंद्रे एक-एक करून तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिलेले आहेत.
सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांवर सेक्टर ३० वाशी येथील सिडको कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवार, ३ जानेवारीपासून तुर्भे सेक्टर २४ येथील ३४९ ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे राधास्वामी कोविड केअर हेल्थ सेंटर व तुर्भे एपीएमसी मार्केट येथील ३१२ ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे एक्पोर्ट हाऊस कोविड केअर हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. तसेच ५६० ऑक्सिजन बेड्स क्षमतेची सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथील कोविड केअर हेल्थ सेंटर सुविधा ४ जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देशित करण्यात आले.
सिंधुदुर्गमधील शाळा बंद
सिंधुदुर्गमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा गुरुवार ६ जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
रत्नागिरीत देखील शाळा बंद
रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा आजपासून बंद होत आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंदचे आदेश दिले आहेत. पहिलीपासून ते बारावीपर्यतचे वर्ग बंद राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये आता ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यातील शाळांबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे.