मुंबईत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात ९ हजारांवर रुग्ण
मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. शनिवारी दिवसभरात सर्वाधिक 9 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे चार नवे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. यात गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि चेंबूर या चार ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक सक्रीय रुग्ण हे अंधेरीत आहेत.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढत आहे. मुंबईत दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. मुंबईत सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत होती. त्यानंतर आता सर्वच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबई शहरापेक्षा उपनगरात कोरोनाचा धोका अधिक असल्याचे समोर येत आहे.
मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 44 दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण 33 दिवस, वांद्रे पश्चिम येथे 34 दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे 37 दिवस, चेंबूर – गोवंडी विभागात 37 दिवस आणि अंधेरी प. येथे 38 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत दररोज सुमारे 42 ते 45 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत कोरोनानं अक्षरशः कहर केला आहे. शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 62 हजार 187 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.