काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्या नैनीताल येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील माहिती स्वतःहा काँग्रेस नेत्यानेच फेसबूकवरून दिली आहे. एवढेच नाही, तर हल्ला करणाऱ्यांच्या हातात भाजपचा झेंडा होता आणि ते सांप्रदायिक घोषणाबाजी करत होते, असेही बोलले जात आहे.
माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे आपले ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वादात आहेत. सलमान खर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना इसिस आणि बोको हरामसोबत केली आहे आणि हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
फेसबूकवर घटनेचे फोटो शेअर करत सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे, हे हिंदुत्व असू शकत नाही, असे म्हणणारा मी अजूनही चूक आहे का? यापूर्वी शाहजहांपूर येथे शनिवारी विहिंपने सलमान खुर्शीद यांचा पुतळा जाळला होता. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेने खुर्शीद यांची जीभ कापण्याची धमकीही दिली होती. यावेळी, अशा लोकांना पाकिस्तानात पाठवायला हवे, असेही विहिंप कार्यकर्त्यांनी म्हटले होते.