नवी दिल्ली : केंद्र सरकारनं वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि मोदी सरकार बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळालं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लढ्याला यश आल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे आज रद्द झाल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झाल्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देशभरात करणार असल्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. शनिवार, दि. २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीनं ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना २० नोव्हेंबरला शेतकरी विजय दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत ठिकठिकाणी रॅली आणि आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून कँडल मार्च आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे.
वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रभारींना पत्र लिहिलं असून यात शेतकरी आंदोलन आणि त्यांचं बलिदान व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट होऊन केल्या गेल्या आंदोलनानंतर जाचक तीन कृषी कायदे रद्द केले गेले आहेत. आज सर्वांनी एकजुटीनं वाईटावर मात केली आहे आणि हे यश देशाच्या पोशिंद्याला समर्पित आहे, असं म्हटलं आहे.