गोवा निवडणूक : बहुमत मिळताच त्वरीत सरकार स्थापनेचा दावा करू : चिदंबरम
पणजी : गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया यायला लागल्या असून, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो. मी याबद्दल खूप आशावादी आहे आणि बहुमत मिळताच आम्ही त्वरीत सरकार स्थापनेचा दावा करू असे काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख उपस्थित होते.
काँग्रेसने दिलेली सर्व आश्वासने सरकार आल्यावर पूर्ण केली जातील. गोव्यातील जनता काँग्रेसला पूर्ण बहुमत देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गोवा हे मोदींसाठी निवडणुकीचे ठिकाण बनले आहे. ते गोव्यात निवडणुकीच्या वेळीच येतात.
आम्हाला तसेच शरद पवारांना मोदींकडून चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही : पटोले
आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काेणत्याही चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, ना शरद पवारांना प्रमाणपत्र गरजेचे आहे, असे परखड मत काँगेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. संसदेत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केलेली स्तुती आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता त्यांनी मत मांडले.
देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे भाषण करु शकतात, यावर विश्वास बसत नाही. देशासमोर बेरोजगारी, कोरोना, कमी होत असलेला विकासदर यावर त्यांनी भाष्य करायला हवे होते, विकासावर बोलायला हवे होते. मात्र एखाद्या टपरीवर चर्चा व्हावी, याप्रमाणे त्यांनी भाषण केले. प्रत्येकवेळी भाषणात पं.नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख करुन जनतेची दिशाभूल मोदी करत आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे मोदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहाेत. कुणी काहीही वक्तव्ये केली तरी त्याचा आमच्यावर काहीच फरक पडत नाही, असेही मत पटोले यांनी मांडले. आमचे महाराष्ट्रातील सरकार हे कॉमन मिनीमम प्रोगॅमनुसार अस्तित्वात आले आहे. सकाळच्या वेळी शपथ घेऊन आमचे सरकार तयार झाले नाही. सरकारमध्ये समावेश असलेल्या तिन्ही पक्षात सामंजस्य असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेही उपस्थित होते.
असे काम करून दाखवू की काँग्रेस आणि भाजपला लोक विसरतील : केजरीवाल
पाच वर्षांत आम्ही असे काम करून दाखवू की काँग्रेस आणि भाजपला लोक विसरून जातील. गोव्याच्या जनतेने ‘आप’ला एकदा संधी द्यावी, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. म्हापसा बसस्थानक दहा वर्षे पूर्ण होऊ शकले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हेलिपॅड मात्र २४ तासात उभारले जाते, अशी टीका करत त्यांनी भाजपवर तोफ डागली.
लूट करण्यासाठी दहा वर्षे अपुरी पडली म्हणून आणखी पाच वर्षे गोव्याच्या जनतेकडे भाजप सत्ता मागत आहे, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. गोव्यात भाजप किंवा काँग्रेसनेही काहीच केले नाही. येथील वीज, पाण्याची तसेच आरोग्य समस्या कायम आहेत. भाजपला आणखी पाच वर्षे दिली तर सरकार लूटच करील. आम आदमी पक्षाने दिल्लीत काम करून दाखविले, त्यामुळे दिल्लीतील जनता खुश असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला मत देण्यासारखेच आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून दिले होते. यातील १५ आमदार पक्ष सोडून गेले. भाजपला पराभूत करायचे असेल तर आम आदमी पक्षाशिवाय पर्याय नाही. काँग्रेस व फॉरवर्ड किंवा इतर पक्षांना मत देऊन आपले मत वाया घालवू नका, असे केजरीवाल म्हणाले.
शिवसेनेचा दरारा आता गोवेकरांना कळायला लागला : आदित्य ठाकरे
गोवा विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोव्यातील वास्को येथे एका जनसभेला संबोधित केले. आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर असून, शिवसेना उमेदवारांसाठी ते प्रचार करत आहेत. यावेळी शिवसेनेचा दरारा काय असतो, ते आता गोव्यातील राजकारणाला कळायला लागले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
जनतेच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना वर्षानुवर्षे नागरिकांचा विश्वास आपल्या कार्यातून जिंकत आली आहे आणि जिंकत राहील. या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जनसेवेसाठी झटणारा शिवसैनिक आपल्यासाठी उभा आहे. गोव्याशी आपले वेगळे नाते आहे. कित्येक जणांचे कुलदैवत, मंदिरे, गाव, घरे इथे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसे सांगितलेले आहे की, भूमिपुत्रांना न्याय द्या, तेच काम आपण इथे करण्यासाठी आलेलो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचा दरारा काय असतो, शिवसेना आली म्हणजे नक्की काय असते, हे या गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागलेले आहे. जरी आपले महाराष्ट्रात राज्य असेल, सरकार असेल आपण सगळे प्रचारासाठी तिथून आलेलो असू, तरी जेव्हा गोवाबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहोत. हा तुम्हाला शब्द देण्यासाठी आलेलो आहे, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.
शिवसेना म्हणून एक आपले धोरण आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर, गाव तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यायाचा म्हणजे नेमके काय करायच? हे शिवसेनेकडून समजून घेतले पाहिजे. मी एकच सांगू इच्छितो की, ही आपली सुरूवात आहे. प्रत्येक निवडणूक आपण लढूच, पण मला खात्री आहे की, प्रत्येक निवडणूक लढणार आणि जिंकणार. तुमचा आमच्यावरील विश्वास आणखी घट्ट होत जाणार. गोव्यात प्रचारासाठी नाही तर आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्यासाठी आलोय. आपल्या जे नवीन गोवा निर्माण करायचे आहे ते आपल्या आशीर्वादाने असेल आणि आपल्यासाठी असेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.