नवी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार : नाना पटोले
नवी मुंबई : मुंबईपाठोपाठ नवी मुंबई महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी दिली जाईल. पक्ष एकट्याचा नसतो तर त्याची विचारधारा मानणाऱ्या सर्वांचा असतो, अशा कानपिचक्या नवी मुंबईतील काँग्रेस नेत्यांना पटोले यांनी दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार मोहन जोशी, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, संतोष शेट्टी, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत उपस्थित होते.
नवी मुंबई काँग्रेस ही कायम सत्ताधारी पार्टीबरोबर फरफटत चालते असा नेहमीच आरोप केला जातो. काही वर्षांपूर्वी राजकीय अज्ञातवासात गेलेले अनिल कौशिक यांना पुन्हा संधी देत काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदा मनपाच्या सत्तेत आली होती. मात्र सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात असून, काही दिवसापूर्वी अचानक चार प्रवक्त्यांना काढण्यात आले होते. काँग्रेस भवनच्या नूतनीकरण उद्धाटन कार्यक्रमात या सर्व घटनांचे पडसाद दिसून येत होते. पटोले यांनी आपल्या भाषणात आणि पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवी मुंबई काँग्रेसबाबत नाराजीचा सुरु दिसून आल्याची चर्चा होत होती.
पटोले म्हणाले, प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवावा लागतो. मात्र मी चार महिन्यात अहवाल पाठवला नाही. शहरात विविध कार्यक्रम घेतले जातात, त्याचे फोटो काढून अहवाल तयार केले जातात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीत तुमच्या कामांचा रिझल्ट दिसणे गरजेचे आहे.
…तर नवी मुंबई अध्यक्षही बदलू
नवी मुंबईत काँग्रेस अंतर्गत वाद मिटवावेत आणि ते मिटवता येत नसेल तर दुसऱ्याला संधी दिली जाईल असा इशारा त्यांनी दिला. इतकंच नाही तर नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्यापेक्षा चांगला व्यक्ती भेटला तर त्याला संधी देण्यात येईल, असंही पटोले म्हणाले. लोकांची कामे करा कोणाच्या घरात दुःखद घटना घडली तर त्याच्या घरी जाऊन भेट घ्या, सांत्वन करा. नवी मुंबई हे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या कल्पनेतून उतरली असून त्यांच्या तो उद्देश्य साध्य करण्यासाठी काँग्रेस सत्तेत असणे गरजेचे आहे असं पटोलेंनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण वाद – दि.बा. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे दोन्ही आमच्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत. दोघांचाही सन्मान राहणे गरजेचे आहे नावासमंधी वाद होणार नाही असा निर्णय घेत मध्यम मार्ग घेण्यात येईल, असे सांगून पटोले म्हणाले की, १०२ घटना दुरुस्ती नंतर मराठा आरक्षण बाबत राज्याला अधिकार राहिला नाही. तरीही विद्यमान विरोधी पक्ष नेता दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे वेगळा काही आयोग बसवण्याचे कारण नाही.
पेट्रोल डिझेल दरवाढ अयोग्य आहेत, अनेक करांतून पैसा केंद्र सरकारकडे जातो. गोळवलकर गुरुजींनी एक पुस्तक लिहले आहे त्यात लोकांना रांगेत उभे ठेवा त्यांच्या हातात भिकेचा कटोरा ठेवा लिहले आहे. तसेच सरकार चालत आहे. गरिबातील गरीब माणसाकडून वर्षाला कमीत कमीत २४ हजार रुपये काढले जातात त्याला २ हजार मदत म्हणून रुपये दिले जातात, असे पटोले यांनी सांगितले.