काँग्रेसला झटका; माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अभिजीत यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती, दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल भवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील नेते सुदीप बंद्योपाध्याय आणि प्रदेश सचिव आणि मंत्री पार्थ चॅटर्जी उपस्थित होते.
अभिजीत मुखर्जी यांनी नुकतीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अभिजीत मुखर्जी तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. नुकत्याच झालेल्या बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचं नव्हे तर डाव्यांचाही सुपडा साफ झाला आहे.
अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी यांनी त्याला परवानगी दिल्यानंतर मुखर्जी यांचा आज पक्ष प्रवेश होत आहे. मुखर्जी हे नलहाटीचे आमदार होते. ते दोन वेळा जंगीपूर येथून लोकसभेवर निवडून आले होते. ते अनुभवी राजकारणी आहे. भाजपमुक्त अभियानासाठी त्यांचा फायदा होईल. सर्व समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांची मोलाची मदत मिळेल, असं पार्थ चॅटर्जी यांनी सांगितलं.