नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ करण्याची मोठी घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. मात्र याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान हॉकीपटूचे नाव राजकीय हेतूने वापरल्याचा आरोप करत, आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमचे नावही बदलायला हवे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने हे नाव बदलण्यामागचे राजकारणही सांगितले आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी, हे देशाचे नायक आहेत. ते पुरस्कारासाठी नव्हे, तर त्यांच्या हौतात्म्यासाठी, विचारांसाठी आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. राजीव गांधी या देशासाठी नायक होते, आहेत आणि राहतील. याच बरोबर, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रति व्यक्त करण्यात आलेल्या सन्मानाचे काँग्रेस स्वागत करते. मात्र, नरेंद्र मोदींनी क्षुल्लक राजकीय हेतूंसाठी त्यांचे नाव ओढले नसते तर बरे झाले असते. तथापि, आम्ही खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही सुरजेवाला म्हणाले.
राजीव गांधी जी इस देश के नायक थे, हैं और रहेंगे।
राजीव गांधी जी पुरस्कारों से नहीं, अपनी शहादत, अपने विचारों और आधुनिक भारत के निर्माता के तौर पर जाने जाते हैं। pic.twitter.com/cnqC1Vo2Im
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) August 6, 2021
यावेळी सुरजेवाला यांनी आरोप केला, की ओलिम्पिक वर्षात खेळावरील बजेट कमी करण्यात आले आणि आता नरेंद्र मोदी लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत. ते कधी शेतकऱ्यांच्या समस्येवरून, कधी हेरगिरी प्रकरणावरून तर कधी महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवत आहेत.
काँग्रेसने म्हटले आहे की, आता आम्हाला आशा आहे की, देशातील खेळाडूंच्या नावावरच आणखी स्टेडियम आणि योजनांची नावेही ठेवली जातील. सर्वप्रथम नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला, अरुण जेटली स्टेडियमचे नाव बदला. भाजप नेत्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या स्टेडियम्सची नावं बदला. आता स्टेडियमचे नाव पीटी उषा, मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस, पुलेला गोपीचंद आणि सानिया मिर्झा यांच्या नावावर ठेवा.