नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी सहकार क्षेत्र, साखर कारखानदारी, एनडीआरएफचे निकष आदी मुद्द्यांवर सुमारे सव्वा दोन तास चर्चा झाली. मात्र, यावेळी शाह आणि पवारांमध्ये १५ मिनिटे बंद दाराआड स्वतंत्र बैठक झाली. या स्वतंत्र बैठकीत राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात असल्याने त्याबाबत वेगवेगळे कयास लढवले जात आहेत.
अमित शाह हे सहकार मंत्री झाल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. संसदेच्या एका कार्यालयात ही भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. ही बैठक सुमारे सव्वा दोन तास चालली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच पेगासस प्रकरणाबाबत पवारांनी आपली भूमिका शाह यांच्याकडे मांडली असून शाह यांनीही सरकारची भूमिका त्यांना सांगितल्याचं समजतं. पेगासस प्रकरणावरून झालेली संसदेतील कोंडी फोडण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एकीकडे भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात विरोधकांची बैठक बोलावली होती. आज सर्व विरोधकांना नाष्ट्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी विरोधकांसह संसदेपर्यंत सायकल रॅलीही काढली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मात्र, हे चित्रं असतानाच पवारांनी शहांची भेट घेऊन काँग्रेसलाही गॅसवर ठेवलं आहे.