नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटात आता म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्युकरमायकोसिसमुळे अनेकांचे जीव जात आहेत. अशावेळी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाळ आणि पवन खेडा यांनी भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. म्युकरमायकोसिसचा सामना करताना केंद्र सरकारच्या तयारीवरुन काँग्रेसनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी सरकार काय मार्ग आखत आहे? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी विचारला आहे.
जेव्हा लोक आमच्यावर निशाणा साधतात आणि विचारतात की विरोधी पक्ष कुठे आहे? मात्र आता तेच लोक सरकार कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहेत, अशी टीका पवन खेडा यांनी भाजपवर टीका केलीय. विरोधी पक्ष जमिनीवर काम करतोय आणि सरकार पूर्णपणे गायब असल्याचा टोला पवन खेडा यांनी लगावलाय. पंतप्रधान मोदी आता खरं बोलत आहेत. मात्र, त्यांना मागील वर्षीच इशारा दिला होता. आमचे नेते राहुल गांधी यांनी इशारा दिला होता की, कोरोनाची त्सुनामी येतेय. तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र, आता मोदींना हे पटलं आहे की, कोरोना विरोधातील लढाई अजून बराच काळ चालेल, अशी टीका के. सी. वेणुगोपाळ यांनी केली आहे.
महामारीविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारनं काय तयारी केलीय, याचं उत्तर द्यावं. कोरोना विषाणू आणि काळ्या बुरशीविरोधात लढण्यासाठी सरकारने काय होमवर्क केलाय? फक्त भाषणबाजी करुन काही होणार नाही. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींकडून कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊस उचलल्याचं पाहायला मिळत नाही, अशा शब्दात वेणुगोपाळ यांनी मोदींवर हल्ला चढवलाय. काळ्या बुरशीविरोधात लढण्यासाठी सरकारचं काय नियोजन आहे? यावरील औषधांचाही मोठा तुटवडा असल्याचं डॉक्टर सांगत असल्याचंही वेणुगोपाळ यांनी म्हटलं आहे.