भाजप नेत्यांनी नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा; काँग्रेसचा खोचक टोला
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/09/pawan-khera.jpg)
नवी दिल्ली : कोरोनाची स्थिती, लसीकरण इंधनदरवाढ, महागाई, गॅसचे वाढलेले दर यांवरून काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर भाजपने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपच्या नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा, असा टोला लगावला आहे.
एका ज्येष्ठ पत्रकाराला राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारल्यामुळे बाहेर काढण्यात आले. हेच राहुल गांधी प्रेम आणि सहिष्णुतेच्या राजकारणाबद्दल बोलतात, अशी टीका भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर केली. याला काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवन खेरा यांनी एक ट्विट करत, अशा प्रकारची नशा तुमच्यासाठी घातक आहे. हे प्राणघातक देखील असू शकते. त्वरित जवळच्या व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधा, असा खोचक टोला लगावला आहे. १९९१ ते २०१२ मधे जे धोरण होते ते आता राबवले जात नाही. नरेंद्र मोदी म्हणाले नवीन धोरण आणणार पण त्यांनी ते केले नाही. नोटाबंदीचा काय फायदा झाला का?, मेक इन इंडियाचे काय झाले? नव्या दृष्टीकोनाची गरज आहे, असे सांगत काँग्रेसच्या मनात स्पष्ट कल्पना आहे. पण ही गोष्ट अर्थमंत्री, नीती आयोग, थिंक टॅक्स यांना समजतच नाही. पंतप्रधानांनी हवे तर काँग्रेसकडे मदत मागावी, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील, असा चिमटा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत काढला.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे आणि यामुळे जनतेला त्रास होत आहे. मोदीजींचे केवळ ४-५ उद्योगपती मित्रांना नोटाबंदीचा लाभ मिळत आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत, असे असूनही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. भारताची मालमत्ता विकली जात आहे पण हा पैसा कुठे जातो हा प्रश्न आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सोडले.