मुंबई : राज्य सरकारच्या या लॉकडाऊनच्या निर्णयावर आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केलीय. विरोधकांच्या या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. घरातील माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम करत आहोत. तर विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय. मोदी हे प्रचारजीवी आहे. ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. भाजप मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहे, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर शरसंधान साधलंय.
काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आणि तो कायम त्यांचे विचार अमलात आणेल. कोविड काळात अनेक गोष्टी लागत आहेत. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आल्याचं पटोले यांनी सांगितलं. लॉकडाऊन आणि पॅकेजबाबत विरोधकांना बोलण्याचा काही अधिकार नाही. भाजप ज्या प्रकारे विरोध करत आहे, ती खेदाची बाब आहे, असंही पटोले यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ 105 रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब 105 रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी 10 हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत, असा घणाघातही चंद्रकांत पाटील यांनी केलाय.