राजकारण

निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसची समिती; अशोक चव्हाण अध्यक्ष

मुंबई : देशातील पाच राज्यांतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम, केरळमध्ये काँग्रेसला फार यश लाभले नाही तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता या निकालांची समीक्षा करुन येत्या २ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश काँग्रेसने या समितीला दिले आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य असतील. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल.

या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button