नवी दिल्ली : राफेल व्यवहारामध्ये झालेले भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून, चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान दिले आहे.
देशाच्या सुरक्षेतून मोदी सरकारने आपल्या मित्रांची तुंबडी भरली. राफेल सौद्याच्या चौकशीसाठी फ्रान्सने न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. पण गेल्या २४ तासांत भारत सरकारकडून याप्रकरणी कुठलीही प्रतिक्रया का आली नाही, अशी विचारणा काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदींनी राफेलच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्यावी, अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर राफेल सौद्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोपांना आणि त्यासंबंधी प्रश्नांना उत्तरं द्यावीत. राफेलच्या चौकशीवरून संपूर्ण मोदी सरकार गप्प का? राफेल करारात ज्या देशाला फायदा झाला आहे, त्या फ्रान्समध्ये चौकशी सुरू आहे. पण ज्या देशाच्या नागरिकांच्या कराचा पैसा लुटला आहे, त्या देशात चौकशी होत नाही. राफेल व्यवहारामध्ये मध्यस्थाला कोट्यवधीची भेट दिली गेली, हे कागदपत्रांवरून उघड होत आहे, अशी टीका खेडा यांनी केली.
राफेल हे एक सर्वोत्तम लढाऊ विमान आहे. त्यामुळेच तत्कालीन यूपीए सरकारने या लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण त्यावेळी विमानाची किंमत ५७० कोटी होती. पण मोदी सरकारने ती वाढवून १,६७० कोटी केली. यूपीए सरकार १२६ विमाने खरेदी करणार होते. पण मोदी सरकारने तर ही संख्या कमी करून फक्त ३६ विमाने का केली, असा सवालही खेडांनी केला.