पणजी : आता आणि निवडणुकीनंतर होणारे पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ दिली आहे. शपथ घेताना निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अशी शपथ देवी महालक्ष्मी आणि बांबोळीतील क्रॉससमोर घेतली आहे. त्यामुळे याशपथेनंतर तरी गोव्यातली पक्षांतरे थांबतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. निवडणुका आल्या की कुठल्याही राज्यात पक्षांतराला उत येतो. ज्याचा राजकीय फायदा जिकडे तिकडे तो नेता जाताना दिसून येतो. महाराष्ट्र विधानसभेच्या आधीही अशीच पक्षांतरे दिसून आली होती.
देशातल्या पाच राज्यात सध्या निवडणुकांचा धुरळा उडतोय. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवार याद्याही जाहीर केल्या आहेत. मात्र निवडणूक आणि याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या कोलांटउड्या सुरू आहेत. अनेकजण पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, तर काहीजण बंड करत अपक्ष लढण्याचा नारा देत आहेत. गोव्यातली परिस्थितीही याहून वेगळी नाही. उत्तर प्रदेश आणि गोव्यातही नेत्यांचं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सुरू आहे. गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी बंड करत अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे, फक्त पर्रिकरच नाही तर काही जुन्या नेत्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अशात काँग्रेसने सावध पवित्रा घेतलाय. कारण काँग्रेसने आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या थेट शपथा दिल्या आहेत.
…तर उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेना पणजीतील उमेदवार मागे घेणार; संजय राऊतांचे संकेत
शिवसेनेने शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीत उमेदवारी दिली असली तरी जर उत्पल यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली तर त्यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांनी तसे स्पष्ट केले आहे.
उत्पल यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमचा पणजीतील उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊ असे ते म्हणाले. निवडणुका जिंकल्या नंतर अपक्ष म्हणून कायम राहू आणि भाजप पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे उत्पल यांच्याकडून लिहून घेऊ असेही राऊत म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे अजून सहा उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. यात पणजी मतदारसंघात निर्माण झालेला तेढा कायम आहे. तेव्हा उत्पल अपक्ष लढणार तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
राऊत म्हणाले की, उत्पलने अर्ज भरला, निवडणूक लढणार असा ठाम निर्णय घेतला तर आम्ही शिवसेनेची पणजी मतदारसंघातील उमेदवार मागे घेऊ. आता उत्पल यांनी निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. विखुरलेला विरोधी पक्ष भाजपची ताकद आहे. पण भाजपने फार संभ्रमात राहू नये, असेही ते म्हणाले.
दऱम्यान, उत्पल यांनी पणजीतून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास त्यांना कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा लाभतो, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतदारांबरोबरच राजकीय निरीक्षकांचेही लक्ष राजधानीतील मतदारसंघातील घडामोडींवर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पणजीतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उत्पल यांच्या पुढील भूमिकेकडेही लक्ष लागून राहिले आहे.
उत्पल पर्रिकर काँग्रेसच्या उदय मडकईकरना भेटले; पणजीत पाठिंबा देण्याची विनंती
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केलेले उत्पल पर्रिकर यांनी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. काँग्रेसने उदय मडकईकर यांना डावलून एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची उदय यांची तयारी नाही. एक तर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे किंवा उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याबाबत उत्पल ठाम आहेत. ते वेगवेगळ्या घटकांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी उदय मडकईकर यांची घेतलेली भेट याच रणनीतीचा भाग होता. दरम्यान, उदय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्हा दोघांची सकारात्मक बोलणी झालेली आहे. परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नंतरच योग्य तो निर्णय घेणार आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत मी माझा निर्णय जाहीर करीन.