Top Newsस्पोर्ट्स

ऐतिहासिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव

टोक्यो : मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण, अ‍ॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८नंतर (अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करत आहेत. त्याच्या घरी आणि संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. नीरजवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नीरजला शुभेच्छा देत आहेत.

नीरज चोप्राकडून सुवर्णपदक मिल्खा सिंह यांना समर्पित

भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षरात करण्यात आली आहे. भारताचा या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस होता. भालाफेकपटू नीरज चोप्राने भारतासाठी या स्पर्धेचा शेवट गोड आणि गोल्डन करुन दिला. दरम्यान नीरजने हे सुवर्णपदक ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवगंत धावपटू मिल्खा सिंह यांना समर्पित केलंय. मिल्खा सिंह यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहीत होतं की आज मी माझे सर्वोत्तम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता, अशी पहिली प्रतिक्रिया नीरजने विजयानंतर दिली.

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला. युवा नीरजने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नीरजच्या संयमाचं, धैर्याचं आणि अतुलनीय प्रदर्शनाचं कौतुकच. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकिया ऑलिंपिकमध्ये देशाला पहिलं गोल्ड मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरजचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

https://twitter.com/GautamGambhir/status/1423980908374224902

नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यावर क्रिकेट जगतातील खेळाडूही ट्विट करून नीरज चोप्राचे अभिनंदन करत आहेत. गौतम गंभीरने ट्विट केले, त्याचा हात १.३ अब्ज लोकांच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतो!.

विरेंद्र सेहवागने सुद्धा नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. ‘तो रॉकेट आहे, बिलियन्स भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू. नीरज चोप्रा तू चॅम्पियन आहेस, या आनंदाबद्दल तुझे आभारी आहोत, असे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

आर्मी मॅन ते गोल्ड मॅन!

नीरज चोप्रा हा भारतीय सैन्यदलातील आर्मी मॅन आहे. त्यामुळे, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनीही ट्विट करुन नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे. तसेच, जेव्हा इच्छा असते तेव्हा एक मार्ग असतो हे नीरज चोप्राने सिद्ध केले आहे. टोकियोमध्ये इतिहास रचलेल्या इतर अनेक ऑलिम्पियनप्रमाणे नीरजचाही सशस्त्र सेना दलासह राष्ट्राला अभिमान आहे, असे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. देशभरातील बॉलीवूड, राजकारण, समाजकारण, क्रीडा आदी सर्वच स्तरातून नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

३७ वर्षांनंतर माझं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं : पी.टी. उषा

https://twitter.com/PTUshaOfficial/status/1423990141966761987

भारताची महान धावपटू पी.टी. उषा यांनी देखील ट्विट करत नीरजचे अभिनंदन केले आहेत. त्या म्हणाल्या की, ‘माझे अपूर्ण स्वप्न ३७ वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. धन्यवाद, माझ्या मुला.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button