नवी दिल्ली : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. या पराभवाची अखेर काँग्रेस हायकमांडने दखल घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावले आहे. तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे हसू झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. आधी रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली आणि शेवटच्या क्षणाला काढून घेतली. त्यानंतर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. या प्रकरणी आता काँग्रेस हायकमांडने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावले आहे. नागपुरात झालेल्या गोंधळाच्या मुद्यावर काँग्रेस हाय कमांडने समन्स दिला आहे. या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. तिन्ही नेत्यांचा पायपोस एकमेकांत नसल्यामुळे खुलासा करण्यासाठी हे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या तिन्ही नेत्यांना या पराभवाबद्दल खुलासा करावा लागणार आहे. या पराभवामुळे राज्यात काँग्रेसचं हसू झाले त्यामुळे हायकमांडने तिन्ही नेत्यांना बोलावून घेतले आहे.
या निवडणुकीमध्ये सुरुवातीला काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर अपक्ष मंगेश देशमुख यांना कॉंग्रेसने समर्थन दिलं. पण मतमोजणी जेव्हा झाली तेव्हा काँग्रेसमध्ये आयात केलेल्या या उमेदवाराला फक्त एक १ मत मिळाले. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, मंगेश देशमुख यांना १८६ व छोटू भोयर यांना १ मत मिळाले. भाजपविरोधात काँग्रेसचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला आहे. त्यामुळेच आता दिल्लीत नेत्यांची झाडाघडती घेतली जाणार आहे.