आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान पुन्हा सावळागोंधळ; मुंबई, पुणे, नाशिक केंद्रांवर घोळ
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचं नाव घेईना. आज पुन्हा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर घोळ झाला. त्यामुळे या अडचणींचा उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून मिळेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
पेपर मिळण्यात विलंब आणि आसनव्यवस्थेतील घोळावरुन पुण्यातील एका केंद्रावरही गोंधळ झाला. तर नाशिकमधील काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गिरणारेच्या केबीएच महाविद्यालयातील केंद्रावरही गोंधळ पाहायला मिळाला. विदयार्थी जास्त आणि पेपर कमी आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय. 11 वाजून गेल्यानंतरही पेपर सुरू झाला नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे. या परीक्षामध्ये दोन सत्रात पेपर असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांना याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
याआधी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा परीक्षेवेळीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. काही उमेदवरांना चुकीचे हॉल तिकीट मिळाले होते. परीक्षा केंद्राची कमतरता. उत्तरप्रदेशपासून चीनच्या वूहाण प्रांतातील पिनकोड प्रवेशपत्रावर देण्यात आला होता. राज्यातील आठ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षेतील गोंधळामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत पुढे ढकलावी लागली होती. त्यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल जामर कुठे आहे..एकाच बेंचवर दोन दोन विद्यार्थी कसे…? कोल्हापूरला सकाळी पेपर अन् दुपारी औरंगाबाद… जायचं कसं? परीक्षाचं योग्य नियोजन करता येत नसेल तर परीक्षार्थींना तुमचं हेलिकॉप्टर द्या परीक्षा झाली की परत करतील…. अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.