फडणवीस दाम्पत्याविरुद्ध ३ वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार; अद्याप चौकशी का नाही ?
आ. अमोल मिटकरी यांचा सवाल
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मलिक यांच्या अटकेविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले असून केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिकाही महाविकास आघाडीने घेतली आहे. आता, भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. अॅक्सीस बँकप्रकरणाची तक्रार ईडीकडे ३ वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. पण, अद्यापही दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे. ‘४ सप्टेबर २०१९ म्हणजे ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ईडीकडे सादर केला, त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?’, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.