मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी पुढच्या आठवड्यापासून मुंबईत खासगी पार्ट्या, समारंभांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा धोका कायम असल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सभागृह अथवा खुल्या जागेत दोनशेपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार असल्यास स्थानिक विभागाच्या सहायक आयुक्तांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक पाहण्यामध्ये सहा फुटांचे अंतर असावे, अशी अट देखील लागू असणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्याकडे आयोजित पार्टीमध्ये सहा सेलिब्रिटी कोविड बाधित झाल्याचे आढळून आले होते. मुंबईत कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची चिंता आयुक्तांनी व्यक्त केली होती. मागील काही दिवसांपासून दैंनदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून येत असल्याने महापालिकेने नियमांमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार स्थानिक सहायक आयुक्तांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली तरच हॉटेल, लग्न समारंभ, धार्मिक, राजकीय अथवा सामाजिक कार्यक्रम, पार्ट्यांमध्ये दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची अनुमती मिळणार आहे. मात्र प्रत्येक पाहुण्यांमधील अंतराची अट पाळणे बांधकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक विभागस्तरावर चार फिरते पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी पुढील आठवड्यापासून संबंधित विभागातील खासगी कार्यक्रमांमध्ये जाऊन अचानक पाहणी करणार आहेत. यामध्ये जागेच्या क्षमतेपेक्षा दोनशेहून अधिक व्यक्ती उपस्थित असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड विधान संहितेनुसार आणि आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते.
असे आहेत नवे नियम…
– बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांसाठी सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींनाच उपस्थितीची परवानगी.
– मोकळ्या, खुल्या जागेत होणार्या कार्यक्रमांसाठी त्या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के संख्येनेच उपस्थितीला परवानगी.
– सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखा, योग्य पद्धतीने मास्कचा वापर करा. वारंवार हात धुवा.
– परिसर, खोल्या, प्रसाधनगृहे यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करा. पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण वेळेत करून घ्यावे.