राजकारण

पोलीस अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्यानेच आयुक्तांची बदली : अनिल देशमुख

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. त्यामुळे आता निष्पक्ष चौकशीसाठी मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून योग्यपणे सुरु आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई करेल. खालच्या किंवा वरच्या दर्जाचा कोणताही अधिकारी असो त्याच्यावर कारवाई होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन यांच्या प्रकरणात एनआयए आणि एटीएस सखोल चौकशी करत आहेत. एनआयए, एटीएसच्या तपासात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते हे सगळीकडून माहिती घेत असतात. गटबाजी ही प्रत्येक ठिकाणी असते. पोलीस आयुक्तालयातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली. चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच चौकशीत बाधा येऊ नये यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला, असेही देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पहिल्यांदा 12500 पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरु झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असतानाही 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.

पोलीस खात्यात नाराजी
परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, ते मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. होमगार्डचे माजी डीजी संजय पांडेही प्रचंड नाराज आहेत. संजय पांडे हे 1986च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचा कारभार देण्यात आला होता. मात्र, या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button